Saturday, February 18, 2012

अनुभुती

आज जे काय करतोय ते पाहुन,दहा बारा वर्षांपुर्वी रहेजा स्कुल ऒफ़ आर्टसमध्ये नेमकं काय शिकायला गेलेलो याचा उलगडा अद्याप झालेला नाहीये.रंग,रेषा,कॆनवास, बहुदा चित्रकला आवडत असल्यानेच मी तिथे होतो (कदाचित).खरं सांगायचं झालं तर आजपर्यंत मला पुर्णाकृती चित्र काढायला कधी जमलंच नाही.हातात चित्र निर्माण करण्यासाठी मिळेल ते घेऊन तासनतास बरंच काही गिरवायचो रादर गिरवलं मी..! दरवेळी माणसांचा, त्यांच्या आकृतीचा आकार शंभर टक्के चुकलाच.फ़क्त कळत होते ते रंग.रंगांमागची भावना.रंगसंगतीतलं इंटरप्रिटेशन.इंटीरीयर डिजायनिंगच्या सबमिशनमधला सगळ्यात सुमार दर्जाचा विद्यार्थी होतो मी.ह्याच सुमारपणासाठी मी बरंच काही ऐकलं.बरंच काही भोगलं.मग कळलं की आपलं वाटणं हे अनेकदा इतरांच्या वाटण्याशी सुसंगत नसतंच कधी.म्हणुन कागदावरल्या अनेक परस्पेक्टीव्हमध्ये मला माझंच जग दिसु लागलं .अगदी,चुकलेल्या आकृतींच्या माणसांसकट..! जी माझी होती माझ्या आवाक्यातली होती आणि मग सापडलं एक पॆरेलल आयुष्य.जे माझ्यासमोर असंख्य प्रश्नांचे तुकडे फ़ेकत गेलं व मी आशाळभुत कुत्र्यासारखं त्यावर तुटुन पडायचो....मिळेल तसं सतत खात गेलो....प्रश्न पडत गेले....शिळे-ताजे होते तसे पडत गेले..!

इथल्या रोजच्या आयुष्याने ब-याचदा उपासमार केली.शरीराची....शरीरालाही न दिसणा-या मनाची..! तर,दुसरीकडे ते जग मात्र पोट भरुन खायला वाढत होतं....प्रश्नंच प्रश्न...छोटे मोठे....नाजुक कठोर...पण,प्रश्न..!

त्या जगात शरीर असलेला फ़क्त एकच मुशाफ़ीर होता....तो म्हणजे मी...आणि बाकी आकृती नसलेली सगळीच अतिसंवेदनशील माणसं...! जी जगत होती एक वेगळं जग ज्याचं नाव होत.....नाटक..!

जिथे जमिन नव्हती....समुद्र नव्हता....वारा नव्हता....दानवही नव्हता आणि देवही..!

होती फ़क्त अनुभुती.....नाटक नावाच्या आयुष्याची.......

बाकी सारं
उर्वरीत

तुला न सापडलेला तुझाच...!

Monday, October 31, 2011

अंतर्मुख

ब-याच वर्षानंतर आज तुला भेटतोय..!! मला नाही माहीत...तु मला अद्यापही ओळखत असशील की नाही...मला नाही माहीत आता तुला आपल्याबद्दलचे कुठले क्षण...कुठले संदर्भ...कुठले प्रश्न आणि कुठली उत्तर तरी आठवत असतील का..? मला माहीत नाही..! तसा तुझ्या आवडीचा कॆलिग्राफ़ीचा पेन हातात घेतलेला नव्याने.पण,काही व्यक्त होण्याऐवजी उगाचंच पुन्हा मागे गुंतलो तर काय करायचं..? सांग ना....रोजचं लिहण्याऐवजी पुन्हा त्याच त्याच घटनांना गिरविण्याची भिती जास्तंच.आज ह्या गेल्या २८वर्षांत काय काय मिळवलं ह्याची नोंद करत होतो...पण,हाती पुन्हा आपलीच शोकांतिका आपल्यासमोर.....काही वेगळं शोधुन काढण्याचंही धाडस होत नाहीये....नाहीतर पुन्हा नव्याने मीच सापडायचो मला स्वल्पविरामांतुन अर्थ शोधणा-या सोलोलोकीज बोलत....आयुष्यातले दोन अप्रतिम सुसाईडस अनुभवल्यानंतर नि:शब्दतेतल्या बिटविन द लाईन्स खुप वाढल्यात....सध्या मन कोमात गेलंय...जिवंत असल्याचा अविर्भाव आणत...कोमात गेलंय ते...त्याच सगळ्या मोनोटोनस भावना....मोनोटोनस प्रतिक्रीया...मोनोटोनस मोनोटोनी..!! अनेकदा स्वत:चं बोलणंही असं काहीसं अतिशय क्लिष्ट होऊन जातं आणि जेव्हा तटस्थपणे विचार करतो तेव्हा असं वाटतं की अरेच्चा कशाचा संदर्भ कशाशी आहे नेमका...? सारं संदर्भहीन व अर्थशुन्य...तरीही बोटं भराभरा किबोर्डवरुन फ़िरताहेत....आज एवढ्या वर्षानंतर घरात नवे सामाजिक प्रश्न डोकावु लागले...नवे नाहीयेत ते....पण नवा अप्रोच घेऊन आहेत...आई वडील भाऊ आणि मी स्वत:...एकमेकांचे काय आहोत..? का आहोत..? आणि पुढे काय म्हणुन उरणार आहोत..?!? असं काय घडतं ज्याने नाती इतकी कॊम्प्लिकेट्ड होऊन जातात..? घरात राहतोय की वावरतोय की मरतोय की अजुन काही काहीही कळत नाहीये....हाताची घडी घालुन हॊलमध्ये बसलो की बेडरुममधुन वेगळ्या नाटकाचे खटके..! स्वयंपाक घरातील देव्हा-यासमोर खटके...घरातल्या कोप-यानकोप-यात ट्रॆजिक ऎटॆक असतांना...मी कुठे जाऊन लपायचं हा प्रश्न हक्काने भेडसावु लागलाय मला...तसं उत्तर मिळालंय मला...स्वत:चा कोंडमारा करुन घेण्याचा....घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या आजकाल रोज नवीन नांदी असते...अगणित प्रवेश सुरु असतात...मध्यंतर असतो पण अंतर्मुख होण्याइतपत..!....मी सध्या घरात थांबतोय...माहीत नाही का..?! कदाचित शोकांतिकेने शोकांतिकेवर हसण्याची वाट पहात असेन मी.....स्वल्पविरामांतुन अर्थ शोधणा-या सोलोलोकीज बोलत....

बाकी सारं
उर्वरीत......

तुझा नसलेला तुझाच..!!